Bhandardara Waterfall : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा परिसराने अक्षरशः हिरवागार साज चढवलाय.गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेंडी,रतनवाडी,घाटघर, हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई परिसरातील डोंगरदऱ्यांतून असंख्य धबधबे कोसळू लागले आहेत.वसुंधरा,नेकलेस,न्हानी,अंब्रेला आणि रिव्हर्स फॉल पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची मोठी गर्दी होत असून भंडारदरा परिसर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून गेलाय.

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आणि त्याचा सर्वाधिक परिणाम भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाल्याचं पाहायला मिळत आहे.शेंडी,रतनवाडी,घाटघर,हरिश्चंद्रगड,कळसूबाई परिसरात निसर्गाने हिरवाईची शाल पांघरली असून डोंगरकड्यांवरून असंख्य धबधबे फेसाळत आहेत.दाट धुके,गार वारे,ढगांमध्ये हरवलेले डोंगर आणि खळखळ वाहणारे ओढे-नाले..असा नयनरम्य नजारा अनुभवण्यासाठी पुणे,मुंबई,नाशिकसह राज्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने भंडारदऱ्याकडे धाव घेत आहेत.