सुट्ट्यांचा हंगाम संपल्याने प्रवाशांनी धरला परतीचा मार्ग : सोलापूर बसस्थानकावर अबालवृद्ध प्रवाशांची वाढली वर्दळ…

सोलापूर व्हिजन

सोलापूर बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. उन्हाळ्या सुट्ट्याचा हंगाम संपल्याने आबालवृद्ध तसेच बच्चे कंपनीने धरला परतीचा मार्ग…

सोलापूर दिनांक – उन्हाळ्याच्या सुट्टीत परगावी गेलेल्या सोलापूरकरांनी शाळा सुरू झाल्याने परतीचा मार्ग धरलेला आहे. सोमवारी सकाळी सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रवाशांची सोलापूर बसस्थानकावर एकच गर्दी होती. उन्हाळ्यामध्ये परगावी जाण्याचा प्लॅन प्रत्येक जण करत असतो त्या अनुषंगाने बच्चेकंपनी आणि महिलावर्ग विशेष करून परगावी जात असतात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर प्रवासी माघारी फिरलेला आहे. त्यामुळे एसटी बसेस आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ वाढलेली दिसत आहे.

सोमवारी सकाळी एसटी बसस्थानक परिसरात अबालवृद्ध प्रवासी मोठ्या प्रमाणात ये जा करत होते. विशेषत्वाने महिलांसाठी प्रवासात पन्नास टक्के सवलत योजना सुरू केल्याने महिलांचा ओढा  महामंडळाच्या एसटी बसेसकडे वाढलेला दिसत आहे. माहेरी गेलेल्या महिलांनी आणि चिमुकल्यांनी पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला आहे.

दरम्यान प्रवशांची वाढती गर्दी पाहाता यंदा एसटी महामंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातून विविध मार्गावर जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या त्याचा फायदा देखील प्रवशांसह एसटी महामंडळाला झालेला दिसत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

* श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या आत्ता पासूनच गर्दी *

दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या नव्या विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी असुसलेला आहे. त्यामुळे वारकरी सुद्धा एसटी बसस्थानकावर गर्दी करीत आहे.  उन्हाळ्याच्या सुरुवातीलाचा प्रवाशांची संख्या वाढली होती. आता सुट्या संपल्यानंतरही प्रवासी मोठ्या संख्येने बसस्थानकावर दिसत आहेत.

फिरण्यास बाहेर गेलेले प्रवासी परतीच्या मार्गावर

पुण्यासह मुंबई आणि इतर शहर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या निमित्त फिरण्यास गेलेला प्रवासी वर्ग सुद्धा पुन्हा आपल्या गावाकडे वळाला आहे त्यामुळे सोलापूर बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ वाढलेली दिसत येत आहे.

Welcome