मुख्यमंत्री आणि सोमनाथ वैद्य यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा ;
राजकीय वर्तुळात आले तर्क वितर्कांना उधाण
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर , दि. ३ सप्टेंबर – आपल्या विविध सामजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपली मोर्चे बांधणी करत असलेले सोमनाथ वैद्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान या भेटीनंतर विविध चर्चेला उधाण आले आहे.
सदरची भेट नक्की कशासाठी झाली आहे असे तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र तसे काही नसून वैद्य यांनी मागील काही दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यातून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंबंधित पत्र दिले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

दक्षिण सोलापुर विधानसभा मतदार संघातील दि. १ सप्टेंबर व २ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या संततधर पावसामुळे खरीप पिकांचे अत्यंत नासधूस झालेले असून येत्या काही दिवसात काढणीला येणा-या पिकांचे नुकसान झालेले आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी या भागातील शेतक-यांनी मृग नक्षत्रांवर आघाडीने ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचेवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता. या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. गेल्या २ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद, तुर, मका, लिंबू, कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनांमध्ये ८०% पेक्षा घट होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी व त्यावर आधारीत सर्व रोजगारी लोकांचे आर्थीक गणित बिघडणार आहे.जिल्हाधिकारी सोलापूर यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ आदेश होवून दक्षिण सोलापूर येथील शेतक-यांचे संततधर पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे स्थानीक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे आदेश निर्गमित करुन प्रती एकरी २५ हजार अग्रीम मदत देणेबाबत आदेश व्हावेत. व झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे करणेबाबत कृषी विभाग यांना आदेश करावेत अशी मागणी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोमनाथ वैद्य यांच्यातील भेट ही राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी निवडणुकांची ही नांदी तर ठरत नाही ना ? असा सवाल अनेकांच्या मनात आता उपस्थित होत आहे.