जड अंत:करणाने गणरायाला भक्तांनी दिला निरोप…!  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… घोषणांनी दणाणले परिसर …..

साश्रू नयनांनी आणि मोठ्या जड अंत:करणाने गणरायाला चिमुकल्या बालगोपाळ भक्तांनी दिला निरोप…!

गणपती बाप्पा मोरया……! पुढच्या वर्षी लवकर या… घोषणांसह हलगीच्या कडकडाटाने दणाणला परिसर…! 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,

सोलापूर , दि. १७ सप्टेंबर – लाडक्या गणरायाने भक्तांच्या घरी आपला पाहुणचार आटोपून अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. परंपरेनुसार भक्तांनी आपल्या अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे गणपती घाट येथे विधीवत विसर्जन केले. यावेळी चिमुकल्या बालगोपाळांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणा दिल्या.

 

     परंपरेनुसार आकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे मंगळवार (दि.१७ ) सप्टेंबर रोजी शहरातील गणपती घाट आणि विष्णू घाट येथे गणपती विसर्जन करण्यासाठी भक्तांची सकाळपासून वर्दळ होती. गणेशभक्तांनी गणपती बाप्पाची आरती करून जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला.

यावेळी विसर्जनस्थळी महापालिकेकडून अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन पार्श्वभूमीवर योग्य नियोजन आणि व्यवस्था करण्यात आली होती. गणपती विसर्जन करताना कर्मचाऱ्यांनी  मर्यादापलीकडे पाण्यात जाऊ नये यासाठी ड्रम ठेवून बॉर्डर करण्यात आली. त्याचप्रमाणे निर्माल्य संकलन केंद्र तसेच गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी ज्यादा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता.

   गणपती बाप्पांना यावेळी असंख्य भाविकांनी निरोप दिला. विसर्जन स्थळावर स्वच्छता आणि पवित्रता राखण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.

यांसह मिरवणूक मार्गावर बॅरिगेटिंगचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दहा दिवसांनंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला  घरगुती तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. चिमुकल्या बालगोपाळांनी आपल्या युलाच्या हातामध्ये गणपती बाप्पांना घेऊन बाप्पाची आरती केली आणि त्यांना शेवटचा निरोप दिला.

        तत्पूर्वी सकाळपासूनच शहरातील विविध रस्त्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या होत्या. पारंपारिक ढोल ताशा आणि लेझीमच्या तालावर तसेच डॉल्बीच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या. मिरूणूक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सदरचे रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आले होते. एकंदर अकरा दिवसांच्या पाहुणचार आटोपवून गणपती बाप्पांनी आपल्या लाडक्या भक्तांचा निरोप घेतला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन दिले.

Welcome