श्री सिद्धेश्वर वुमन्स इंजीनियरिंग परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केली नाराजी

– ऑनलाइन सर्वर झाले डाऊन शॉर्टहँड टंकलेखन परीक्षे पासून विद्यार्थी राहिले वंचित
– महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केला संताप
– बुधवारी शॉर्टहँड टंकलेखनची न झालेली परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची केली मागणी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २६ जून – सोलापूर शहरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये आयोजित केलेली शॉर्टहँड टंकलेखन परीक्षा ऑनलाईन सर्वर डाऊनमुळे झालीच नाही. यामुळे सोलापूरसह लातूर धाराशिव तुळजापूर अशा विविध ठिकाणाहून परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला आहे. शासनाच्या तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या नियोजन शून्य कारभारावर नाराजी व्यक्त करताना सर्वर डाऊन झालेले असताना देखील परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना का प्रवेश दिला ? सर्वर डाऊन झालेले आहे हे माहीत असून देखील विद्यार्थ्यांना केवळ कॉम्प्युटर समोर का बसवले ? परीक्षेला आलेली विद्यार्थ्यांची पहिली बॅच परीक्षा विनाच केंद्रामध्ये बसून असताना उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचमधील विद्यार्थ्यांना सर्वर डाऊन झालेले का कळवले नाही. असे विविध प्रश्न उपस्थित करत शासनाला तसेच शिक्षण परिषदेला धारेवर घेतले. सर्वर डाऊन झालेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला येऊ नये असा मेसेज देणे बंधनकारक असताना देखील तो दिला गेला नाही त्यामुळे विद्यार्थी तसेच पालक या घटनेमुळे आक्रमक झाले होते. सोलापूर शहरातील या परीक्षा केंद्रावरील सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून दरवर्षी टंकलेखन परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी विषयांच्या टंखलेखन परीक्षा घेतल्या जातात. त्याच पद्धतीने शॉर्टहँड टंकलेखन परीक्षा देखील घेतली जाते. सदरच्या या परीक्षा टाईपराईटर मशीनद्वारे घेतल्या जात होत्या. मात्र बदलत्या काळानुसार सदरच्या परीक्षा कॉम्प्युटरवर आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सदरची परीक्षा ही श्री सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार होती. मात्र ऑनलाईन सर्वरमध्ये आलेल्या तांत्रिक कारणामुळे परीक्षा होऊ शकली नाही या घटनेला विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच पालकांनी शासनाला आणि शिक्षण परिषदेला जबाबदार धरले आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यापूर्वी त्यांना या संदर्भात कळवणे गरजेचे होते तसे केले गेले नाही. गुरुवारी पुन्हा शॉर्टहँड 120 वेगमर्यादेची परीक्षा होणार आहे त्यामध्ये देखील असेच तांत्रिक बिघाड होणार असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा होणार आहे की नाही हा संदेश द्यावा जेणेकरून दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांचे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होणार नाही. असे सांगत बुधवारी रद्द झालेली शॉर्टहॅन्ड टंकलेखन परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने शॉर्टहँड परीक्षा घेतली जात नव्हती. परंतु काही कारणास्तव ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास सुरुवात केली. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली शॉर्टहँडची ऑनलाईन परीक्षा अशाच पद्धतीने रद्द केली गेली. त्या परीक्षेमध्ये देखील तांत्रिक बिघाड आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. पहिले वर्ष असल्याने पालकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नाही परंतु सलग दुसऱ्या वर्षी देखील हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पुढील वर्षात संपुष्टात येत आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करावयाचे असा सवाल देखील प्रशासनाला उपस्थित केला आहे.
मी माझ्या दीड वर्षाच्या मुलांला घरात ठेवून परीक्षेला आले. मात्र याठिकाणी परीक्षा झालीच नाही. इतर शहरातून जिल्ह्यातून आणि गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना या घटनेचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या नुकसान झालेले आहे मागील वर्षी देखील अशीच परिस्थिती होती.
निकिता महेश माने, परीक्षार्थी
ऑनलाइन परीक्षा घेण्यापूर्वी नेटवर्क तपासून घेणे बंधनकारक आहे. गतवर्षी देखील शासनाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन परीक्षा घेतली होती परंतु ती परीक्षा फोल ठरली यावर्षी देखील हीच परिस्थिती आली आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय करायचे? शासनाने सदरची ऑनलाईन परीक्षा तात्काळ रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच परीक्षा घ्यावी.
जयराज ठाकूर , पालक