गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा घुमाल निनाद : ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन… !


पारंपारिक वेशभूषा परिधान करून गणेशभक्तांनी केले स्वागत
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ७ सप्टेंबर – ” गणपती बाप्पा मोरया ” ” मंगलमूर्ती मोरया ” च्या जय घोषात लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी भक्तांच्या घरोघरी झाले. ढोल ताशांच्या गजरात अन् पारंपारिक वेशभूषा परिधान करून चिमुकल्या बच्चेकंपनीने लाडक्या गणपती बाप्पांना आपल्या इवल्याश्या हातात घेऊन बाप्पांचे जल्लोषमध्ये स्वागत केले. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अबालवृद्ध गणेशभक्त आसुसलेला होता. कधी गणेश चतुर्थी येते , अन् गणपती बाप्पा घरी येतोय, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. ती उत्सुकता संपुष्टात आली. शनिवार ( दी. ७ ) सप्टेंबर रोजी सकाळपासूनच अबालवृद्ध गणेशभक्तांनी शहरातील महत्वाच्या बाजारपेठा मधला मारुती , टिळक चौक , परिसरात खरेदीसाठी गर्दी केली होती.

अनेक बाळगोपाळांनी बाप्पाची सुरेख मूर्ती घेऊन आपल्या पालकांसह जल्लोष साजरा केला. तर काहींनी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून श्रींचे स्वागत केले. तसेच बाप्पांच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे मखर , गृहसजावटीच्या वस्तू आणि प्रासादिक साहित्यांसह गौरी गणपतींचे निमित्ताने देखील नवीन गौराईचे मुखवटे अशा अनेक वैविध्यपूर्ण साहित्यांची खरेदी केली. विशेषत्वाने महिलांची बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. यंदा बाजारपेठेत महागाईची झळ ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. गणेशमूर्तींच्या दरामध्ये देखील दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींची किंमत देखील वाढलेली आहे. त्याचप्रमाणे इतर साहित्यांच्या दरामध्ये देखील वाढ दिसून येत आहे.

दरम्यान शनिवारी ( दि. ७ ) सप्टेंबर मोठ्या उत्साहात आणि आनंदात भक्तांच्या घरोघरी बाप्पांचे आगमन झाल्यानंतर पुरोहितांच्या मंतरघोषात श्रींची विधिवत प्राण – प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणी बेरिगेट्स लावण्यात आले होते.
गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे आमच्या घरी आगमन.
सालाबाद प्रमाणे दरवर्षी गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागून असते. त्यानुसार बाजारपेठेत गणपती बाप्पा आणि विविध साहित्य घेण्यासाठी आलो आहोत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या मूर्तींचे दर वाढलेले आहेत. मात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करणार आहे.
– नरेश गंधाल , गणेशभक्त.
श्रींच्या आकरा दिवसांच्या पूजेसाठी लागणारे प्रासादिक साहित्य घेण्यासाठी भक्तांचा कल….

गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. अकरा दिवसांचा पाहुणचार बाप्पा भक्तांच्या घरी घेणार आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठेत विविध प्रकारचे प्रासादिक साहित्य दाखल झाले आहेत. त्यामध्ये धूप , अगरबत्ती , उद , सुपारी , कापूर , मोठ्या आकाराची उदबत्ती , सुवासिक अत्तर , वस्त्रमाळ , फुलवाती , भिमसेनी कापूर , आदीं प्रासादिक साहित्य उपलब्ध असून विशेष करून मोठ्या आकाराची उदबत्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. गौरी पूजन निमित्त संपूर्ण दिवसभर ही अगरबत्ती सुरूच राहते.
– गौरव सुगंधी , विक्रेते मधला मारुती.