गौराईचे सोनं पावलांनी आगमन !
सुवासिनी महिलांनी सायंकाळी गौरीचे केले विधिवत आवाहन….
सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी
सोलापूर , दी. ११ सप्टेंबर – गौरी आली….. सोनं पावलांनी…… काय घेऊन आली….. सुख समृद्धी……. गौरी आली………. सोनं पावलांनी……. काय घेऊन आली…….आरोग्य धन संपदा…. ! असे म्हणतं ,
सुवासिनी महिलांनी सायंकाळी गौरीचे आवाहन केले. यावेळी भक्तांच्या घरोघरी मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. गौराई आणि पिळवंडाच्या येण्याने सर्वत्र आनंदोत्सव पसरला होता.

” निमित्त होते गौरी गणपती सणाचे ” ! सोलापूर शहर जिल्ह्यात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सायंकाळी गौरीचे विधिवत आवाहन करण्याचा मुहूर्त होता, त्यानुसार सुवासिनी महिलांनी एकत्रित येऊन सुपामध्ये जेष्ठा आणि कनिष्ठा गौराईचे मुखवटे ठेवून त्यांची तुळशीवृंदावना समोर यथासांग पूजन आणि विधिवत आरती करण्यात आली. तद्नंतर सुवासिनी महिलेच्या माध्यमांतून गौरीचे आवाहन अर्थात , गौरीचा भक्तांच्या घरोघरी आनंदात गृहप्रवेश केला. त्यानंतर घरातील देव्हाऱ्याशेजारी चौरंगावर गौरी मुखवटे विराजित करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गौरी सजावट करण्यात आल्यानंतर गौरीच्या मुखवट्याना साडी परिधान करून त्यांची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आगमनास जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीला शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवद्य अर्पण करण्यात आला.
दरम्यान दुसऱ्या म्हणजेच, गौरी पूजना दिवशी सकाळी गौरीस विविध अलंकारांनी सजवले गेले , सुवसिक पुष्पहार अर्पण करून परंपरेनुसार वेदोक्त मंत्र पुष्पांजली वाहून आरती करण्यात आली. यावेळी गौराई समोर विविध सोळा प्रकारच्या भाज्यांचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. दिवसभर घरामध्ये मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाचे चरणी भक्तगण तल्लीन होऊन जातात. गौरी पूजन करून सुवासिनी महिला हळदी कुंकवाच्या समारंभात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते. अनेक आप्तेष्टांच्या घरी जाऊन गौरी पूजन आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न होते. गौरी विसर्जन दिवशी मोठ्या जड अत:करणाने सुवासिनी महिला भाविक गौरीचे विधीनुसार दोऱ्यांचा कार्यक्रम घेऊन गौरी विसर्जन करण्यात येते. या तीन दिवसांच्या काळात भक्तांच्या घरोघरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते.
गौरीचे विधिवत आवाहन करून पूजन.
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील परंपरेनुसार आमच्या घरामध्ये गौरीचे आगमन झाले. यावेळी गौरीचे पूजन करण्यात आले. हळदी कुंकू वाहून आरती केली. तद्नंतर सुपात गौरी ठेवून घरात सर्वत्र फिरविण्यात आले. गौरीला शेपूची भाजी नेवेद्य दाखवला.यावेळी साऱ्या घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
– लाड, महिला भाविक.