बापरे……दवाखाना अडकला अंधाराच्या काळोखात रुग्णांचे भविष्य बनले अंधारमय….कोणी लक्ष देणार का ?
सोलापूर व्हिजन

सोलापूर दि – कामगारांना वैद्यकीय सेवा अभावी हालअपेष्ठा होऊ नये यासाठी राज्य सरकारने विमा दवाखाना सुरू केला. शहरातील मध्यवर्ती भागात विमा दवाखाना सुरू केल्यानंतर त्याचा लाभ सर्व कामगारांना झाला परंतु कालांतराने विमा दवाखाना कालबाह्य होत मागे पडला. त्याची जागा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून नामवंत खाजगी हॉस्पिटल्सनी घेतली. शहरात नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हॉस्पिटल्स उभारण्यात आले त्यामुळे खाजगी हॉस्पिटलकडे रुग्णांचा ओढा वाढला. पर्यायाने सरकारी विमा दवाखान्यात उपलब्ध असणाऱ्या सुविधा ह्या अपुऱ्या पडू लागल्या. तंत्रज्ञान आणि विविध साधन सामुग्री मनुष्यबळ या अशा अनेक सुविधांच्या आभावी वैद्यकीय सेवा पुरवण्यात विमा दवाखाना कुचकामी ठरू लागला. त्यामुळे यावर अवलंबून असणारे रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे वळू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विमा दवाखान्यांमध्ये गुल झालेली बत्ती होय…. विमा दवाखान्यात बत्ती गुल झाल्याने अनेक रुग्णांचे हाल बेहाल झालेले होते.

रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या धुवाधार पावसात विमा दवाखान्यात बत्तीगुल झाली..त्यामुळे अनेक रुग्णांना अंधारमय जनरल वार्डामध्ये मच्छरांचा प्रसाद घ्यावा लागला. विज गेल्याने तसेच कालबाह्य झालेले जनरेटर बंद पडल्याने वैद्यकीय सेवा पुरवण्यात विलंब लागला. अशावेळी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांना तसेच आलेल्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. अगोदरच पावसाळा सुरू झाल्याने शहरात डेंगू , मलेरिया , चिकनगुनिया अशा विविध रोगांची साथ पसरली आहे. अशातच विमा दवाखान्यामध्ये सुईसुविधा अपुऱ्या पडू लागल्याने रुग्णांचे भविष्य अंधारमय बनले आहे. या ठिकाणी गरजवंत तसेच दारिद्र्यरेषेखालील अनेक करून वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येतात परंतु त्यांच्या पदरात अनेक हालअपेष्टा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच व्याधींनी त्रस्त झालेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक या सुविधेमुळे अधिक दयनीय बनत चालला आहे. शासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी आता स्थानिक रुग्ण आणि नातेवाई कांमधून केली जात आहे.