फास्टट्रॅक कोर्टात चालवून बदलापूर आणि कलकत्ता घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २१ ऑगस्ट – बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच ही प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन येथे निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकारले.

सोलापूर शहर महिला काँग्रेसने या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की, बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. त्याच प्रमाणे पश्चिम बंगाल मधील आर. जी. कार. मेडिकल हॉस्पिटलमध्ये शिकत असलेल्या एका निवासी महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एन. डी.ए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या निष्क्रियतेपणामुळे देशात आणि महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत.

बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत. देश आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे. त्यामुळे केंद्रातील एन. डी . ए.सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊन रस्त्यावर उतरत आहे. देशात आणि राज्यात बहिणी तर सुरक्षित नाहीतच पण आता तीन चार वर्षाच्या लेकीसुद्धा सुरक्षित नाहीत, बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत व कलकत्ता येथील झालेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. सदर प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. निष्क्रिय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निषेध आंदोलनात माजी महिला अध्यक्ष अँड करिमुनिसा बागवान, हेमा चिंचोळकर, माजी नगरसेविका भारती ईप्पलपल्ली, आशा म्हेत्रे, शोभा बोबे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रेखा बिनेकर, अरुणा बेंजरपे, रुकय्याबानू बिराजदार, सुनिता शेरखाने, लता सोनकांबळे, सलीमा शेख, मुमताज शेख, रोहिणी धोत्रे, आशा गायकवाड आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.