मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा ; अंगणवाडी सेविकांना मनस्ताप

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा ; अंगणवाडी सेविकांना मनस्ताप

ऑफलाइन अर्ज घेणार; ऑनलाइनला विरोध

सोलापूर व्हिजन

सोलापूर १२ जुलै – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरताना नारी शक्ती अ‍ॅप सुरळीत चालत नसल्याने अंगणवाडीताईंना मनस्ताप होत असून विनाकारण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता यापुढे ऑनलाइन अर्ज भरण्यास अंगणवाडीताईंनी विरोध दर्शविला असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन ते प्रकल्प कार्यालयात सादर केले जातील, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली. दरम्यान, अंगणवाडी कर्मचार्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला वेळ मिळत नसून याविरोधात येत्या 18 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाइनबरोबरच नारीशक्ती अ‍ॅपवर ऑनलाइन भरावे लागत आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना नारी शक्ती अ‍ॅप ओपन होत नाही. सर्व्हर डाउन असते, कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागत आहे. संपूर्ण माहिती भरून कागदपत्रे अपलोड केली तर अर्ज सबमिट होत नाही. मध्येच मोबाइलवरील संपूर्ण स्क्रीन पांढरी होते. दोन दोन तास प्रयत्न करूनही एकही अर्ज सबमिट होत नाही. अर्ज भरण्याच्या नादात मूळ कामापासून दूर रहावे लागत आहे. अशातच अंगणवाडीत महिलांची होणारी गर्दीने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. यातूनच मानसिक ताण येऊन मोहोळ तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वारसांना मदत द्या अन्यथा राज्यभर वणवा
अंगणवाडी कर्मचार्‍यांची मानधनवाढ, पेन्शन व इतर मागण्यांचा विचार केला नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरणार नाही. केवळ ऑफलाइन अर्ज भरून प्रकल्प कार्यालयात जमा करू. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याचा मनस्ताप झाल्याने तुटपूंज्या मानधनावर काम करणार्‍या मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) येथील अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला. या अंगणवाडी सेविकेच्या कुटूंबियांना सरकारने तत्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा 18 जुलैच्या मोर्चानंतर आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिला आहे.

Welcome